उद्याच्या महाराष्ट्रासाठी समाजसुधारकांची फळी निर्माण होणे आवश्यक : आमदार अँ ड.आशिष शेलार. ग.म.मुळे स्मृती व्याख्यानमालेच्या तपपूर्ती स...
उद्याच्या महाराष्ट्रासाठी समाजसुधारकांची फळी निर्माण होणे आवश्यक : आमदार अँड.आशिष शेलार.
ग.म.मुळे स्मृती व्याख्यानमालेच्या तपपूर्ती सोहळ्याचा शुभारंभ.
नगर : संपूर्ण भारत देशात महाराष्ट्र राज्य हे सर्वार्थाने वेगळे व
संपन्न असे आहे. ७२० किलोमीटरचा समुद्र किनारा, सह्याद्रीची भक्कम
तटबंदी, मुबलक नैसर्गिक
साधन संपत्ती, दर्जेदार शिक्षण
व्यवस्था, समृध्द
सांस्कृतिक परंपरा, उद्योग, कृषी व्यवस्था
महाराष्ट्राचे वैशिष्ट्ये आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र सर्वच बाबतीत
संपन्न आहे. उद्याच्या महाराष्ट्राचा विचार करायचा तर तो तरूणाईचा आहे. कारण
राज्याची ४० दशलक्ष लोकसंख्या ही १८ वर्षाखालील आहे. ही नवी पिढीच उद्याच्या
महाराष्ट्राचे भविष्य आहे. त्यामुळे या पिढीच्या नजरेतून विचार करण्याची गरज आहे.
भविष्यात अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. त्यासाठी उद्याच्या
महाराष्ट्रासाठी समाजसुधारकांची मोठी गरज आहे. त्यांच्या माध्यमातून अनेक
समस्यांची उकल सर्वांना मिळून करता येईल,
असे विचार भाजप नेते आ.अँड.आशिष शेलार यांनी मांडले.
जनजाती कल्याण आश्रम,
संस्कार भारती,राष्ट्रहित संवर्धक मंडळ आणि भारत भारती नगर यांच्यातर्फे ग.म.मुळे
स्मृती व्याख्यानमाला तपपूर्ती समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. माऊली सभागृहात
या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना
‘उद्याचा’ महाराष्ट्र या
विषयावर अँड.शेलार बोलत
होते. प्रारंभी संस्कार भारतीच्या सदस्यांनी महाराष्ट्राची लोकधारा या विषयावर भक्तीगीते, लोकगीते, भारुड, पोवाडा सादर करीत
उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. व्याख्यानमालेच उद्घाटन प्रज्ञाचक्षू मुकुंदकाका
जाटदेवळेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी व्यासपीठावर आ.आशिष शेलार, जनजाती कल्याण आश्रमाचे प्रशांत आढाव, संस्कार भारतीचे अध्यक्ष
अँड.दिपक शर्मा, भारत भारतीचे चेतन
जग्गी, राष्ट्रहित
संवर्धक मंडळाचे किशोर गांधी आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते
‘विमर्श - जागर विचारांचा’ या विशारद पेटकर यांनी संपादीत केलेल्या स्मरणिकचे
प्रकाशन करण्यात आले.
शेलार यांनी आजच्या महाराष्ट्राचा वेध घेत भविष्यातील
महाराष्ट्राचे विवेचन केले. ते म्हणाले की,
आज महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्या जवळपास ४५ टक्के आहे. राज्य
संपन्न असले तरी पर्यायवरण, भूजल स्तराची
खालावलेली पातळी ही गंभीर बाब आहे. महिलांना पाण्यासाठी कित्येक किलोमीटरची पायपीट
करावी लागते. वातावरणीय बदलांमुळे कृषी व्यवस्थेसमोर प्रश्न आहेत. गावांचे होणारे
बकाल शहरीकरण हाही चिंतेचा विषय आहे. बदललेल्या खाद्य संस्कृतीने आरोग्याचे प्रश्न
निर्माण झालेत, शहरीकरणामुळे
कुटुंब व्यवस्था धोक्यात आलेली आहे. युवकांना रोजगाराची चिंता आहे. त्यासाठी
त्यांना कौशल्य आधारित शिक्षण मिळणे गरजेचे आहे. आर्टीफिशियल इंटेलिजेंसचा वापर करून
उद्योग, व्यवसायात
क्रांती घडवली पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भ्रष्टाचार विरहित व्यवस्था ही
उद्याच्या महाराष्ट्राची मोठी गरज असणार आहे. त्यासाठी आतापासूनच लॉबी तयार करून
काम करावे लागेल. हे एकट्या सरकारचे किंवा प्रशासनाचे काम अजिबात नाही. आजचा महाराष्ट्र
हा संत विचारांनी घडला आहे. संत ज्ञानेश्वर,
संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज,
महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी वेळोवळी समाजाला दिशा दिली. त्यांच्या
मजबूत वैचारिक पायांवर महाराष्ट्र उभा राहिलाय. उद्याच्या महाराष्ट्रासाठीही अशाच समाजसुधारकांची
नितांत गरज आहे. अशी फळी निर्माण झाल्यास उद्याचा महाराष्ट्रही सुखी समृध्दी असेल.
यासाठी समाजात चांगले विचारमंथन घडणे आवश्यक आहे, तोच प्रयत्न जनजाती कल्याण आश्रम अशा व्याख्यानमालांच्या
माध्यमातून करीत आहे, असे विचार शेलार
यांनी मांडले.
उद्घाटनपर भाषणात प्रज्ञाचक्षू मुकुंदकाका जाटदेवळेकर म्हणाले की, देशाचे व महाराष्ट्र
भाग्य आहे की आपल्याला संतांचे मार्गदर्शन लाभले आहे. निस्वार्थांचे समूह एकत्र
येतात तेव्हा मोठे कार्य होते. जनजाती कल्याण आश्रम असाच एक निस्वार्थांचा समूह
आहे जो समाजासाठी झटत आहे. ईश्वरप्रेम व राष्ट्र प्रेम हा महाराष्ट्राचा इतिहास
आहे. संस्कृती व सभ्यतेची मोठी परंपरा महाराष्ट्राला आहे. त्यामुळे उद्याचा
महाराष्ट्रही आजच्या इतकाच प्रगल्भ,
राष्ट्रप्रेमी व समृध्द असेल यात शंका नाही. कार्यक्रमाचे
प्रास्ताविक नगरचे ग्रामदैवत असलेल्या माळीवाड्यातील विशाल गणपती देवस्थान
ट्रस्टचे अध्यक्ष अँड. अभय आगरकर यांनी केले. ते म्हणाले की, जनजाती कल्याण आश्रमाचा
हा व्याख्यानमालेचा तपपूर्ती उपक्रम समाजमनाचा सेतू बांधण्याचा प्रयत्न आहे.
ग.म.मुळे हे समर्पित स्वयंसेवकांचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्या नावाने होत असलेल्या
या व्याख्यानमालेसाठी अनेक जण प्रत्यक्ष,
अप्रत्यक्ष प्रयत्न करीत असतात. हा उपक्रम भविष्यातही कायम राहून
समाजाला विचार देईल, असा विश्वास
त्यांनी व्यक्त केला.
COMMENTS